2015-11-04-06-34-26गोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...
7870
history-of-saptakotishwarThe Saptakotishwar Temple is one of the oldest and a very ancient temple in Goa. It is mentioned in ancient scriptures and the recorded history of the...
12970
2015-11-04-06-25-58फिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...
8730
2015-11-04-06-21-41सप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....
6930
2012-02-13-06-36-35 फार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे  वास्तव्य करून होते. त्याकाळातील...
24680

Login Form

सप्‍तकोटीश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार

श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार

इतिहासातील सोनेरी पान

बारमाही हिरवेपण जपणारे डोंगर, दूरवर पसरलेले स्‍वच्‍छ व सुंदर समुद्रकिनारे, नारळाच्‍या उंचच उंच बागांनी वेढलेला निसर्गसुंदर परिसर, मांडवी व जुवारी सारख्‍या महानद्या व खनिज संपत्तीने समृद्ध असलेले राज्‍य म्‍हणजे गोवा. या राज्‍यात असंख्‍य पर्यटनस्‍थळे आहेत आणि त्‍यात सर्वाधिक मंदिरे आहेत. गोव्‍यातील मंदिरे पाहिली की, गोव्‍याची भूमी ही देवभूमी आहे यावर विश्वास बसतो. पण या देवभूमीत एक मंदिर असे आहे की, ज्‍याने इतिहासाच्‍या पाऊलखुणा आजही जपलेल्‍या आहेत आणि तरीही देवदर्शनासाठी तीर्थाटन करणा-या तमाम लोकांमध्‍ये अजूनही अल्‍पपरिचित राहिलेले आहे. ते मंदिर म्‍हणजे नार्वे गावातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर.

गोवा राज्‍यातील तालुका मुख्‍यालयाच्‍या नैऋत्‍येस सुमारे १० कि.मी. अंतरावर नार्वे गाव वसलेले आहे. डिचोलीहून मये तलावापर्यंत किंवा पिळगाव मार्गे श्रीसप्‍तकोटीश्‍वराच्‍या शिवालयापर्यंत जाण्‍यासाठी डांबरी रस्‍ता असल्‍यामुळे प्रवासात फारशी अडचण येत नाही.

प्राचीन काळापासून श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे फार महत्त्व होते. संगमेश्वरक्षेत्र महात्‍म्‍यामध्‍ये कोकणातल्‍या सहा श्रेष्‍ठ महादेवाच्‍या स्‍थानांचा उल्‍लेख आला आहे. त्‍यात सप्‍तकोटीश्‍वर महादेवाचा समावेश आहे. सह्याद्री खंडातील पहिल्‍या अध्‍यायानुसार सह्याद्रीच्‍या पायथ्‍यापासून उगम पावलेल्‍या पंचनद्यांचा समुद्राशी ज्‍या ठिकाणी संगम झाला, त्‍या नद्यांच्‍या तीरावर सप्‍तर्षींनी अनेक वर्षे तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि वरदान म्‍हणून त्‍याला त्‍याच स्‍थळी वास्‍तव्‍य करण्‍यास सांगितले. या तपश्चर्येच्‍या काळात त्‍यांच्‍या मुखातून सात कोटी (सात प्रकारचे) मंत्र निघाले म्‍हणून त्‍यांनी या देवाला सप्‍तकोटीश्‍वर हे नाव दिले.

नार्वे गावातील श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे मंदिर पूर्वी दीपवती म्‍हणजे सध्‍याच्‍या दिवाड बेटावर होते. मौर्य, कदंब, चालुक्‍य वगैरे राजवंशांनी या भूमीवर राज्‍य केले. मौर्यांच्‍या अस्‍तानंतर कदंबांचा उदय झाला. या राजघराण्‍याच्‍या मूळपुरुषाचे नाव त्रिलोचन उर्फ जयंत असे होते. कदंब राजवंशातील राजे श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे परमभक्‍त होते. कदंब राजा दुसरा जयकेशी (.. ११०४ - ११४८) याने इ.. ११३८ मध्‍ये जी सोन्‍याची नाणी पाडली त्‍यावर खालीलप्रमाणे मजकूर आहे.श्रीसप्‍तकोटीश

वरविरा

जयकेशी देव

मचलवरमारी

बाराव्‍या शतकात कदंब राजांचे हे कुलदैवत दीपवती बेटावर होते. त्‍यांनी आपल्‍या कुलस्‍वामीचा थाट तितकाच वैभवशाली ठेवला होता. हे मंदिर अतिशय भव्‍य व अत्‍यंत सुंदर होते. कोरीव शिल्‍पांनी आतून व बाहेरून नटलेले होते. शिवालयाच्‍या गाभा-यात तांबड्या रंगाचे सुवर्णवर्खी शिवलिंग लखाखत होते. कदंब राज मोठ्या अभिमानाने आपल्‍या बिरूदावलीत या देवतेचा उल्‍लेख करीत. श्रीसप्‍तकोटीश्‍वर लब्‍धवर प्रसाद श्री कदंबवीर’ असे ते स्‍वतःला म्‍हणवून घेत.

.. १३५२ मध्‍ये बहमनी सुलतान अल्‍लाउद्दीन गंगू हसन याने कदंबांचे राज्‍य जिंकून घेतले. गोव्‍यात सुलतानशाही सुरू झाली. त्‍यात मंदिरे उद्ध्‍वस्‍त झाली, देवदेवतांच्‍या मूर्ती फुटल्‍या, धर्मग्रंथ जळाले. या सुलतानी तडाख्‍यातून श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे शिवालयही सुटले नाही. या मंदिरातील शिवलिंगाखाली संपत्ती दडवून ठेवलेली असेल या लालसेने यवनांनी ते शिवलिंग उखडून काढले. परंतु त्‍यांना तिथे काही मिळाले नाही. त्‍यांनी आपल्‍या अपयशाचा राग सप्‍तकोटीश्‍वराच्‍या लिंगावर काढला. त्‍यांनी ते तेजस्‍वी शिवलिंग शेताच्‍या बांधावर चिखलात घालून ठेवले. .. १३६६ पर्यंत म्‍हणजे सुमारे १४ वर्षे बहमनी सुलतानांनी गोव्‍यावर राज्‍य केले. पुढे विजयनगरच्‍या राजांनी धर्मध्‍वज हाती घेतला. .. १३६७ मध्‍ये राजा हरिहर याने विद्यारण्‍यमाधव नावाच्‍या प्रधानाच्‍या हाताखाली मोठी फौज देऊन त्‍याला गोव्‍यावर पाठविले. त्‍याने सुलतानाच्‍या जरबेतून गोव्‍याची मुक्‍तता केली. श्रीसप्‍तकोटीश्‍वर व गोव्‍यातील इतर मंदिरांचा विद्यारण्‍यमाधवाने जीर्णोद्धार केला.

.. १५१० मध्‍ये पोर्तुगीजांनी गोव्‍यावर आक्रमण केले आणि गोवा बेट व त्‍याच्‍या आसपासचा परिसर जिंकून घेतला. त्‍यानंतर वीस वर्षांनी मिंगेल वाझ या पोर्तुगीज धर्माधिका-याने गोवा बेटावरील मंदिरे उद्ध्‍वस्‍त केली. त्‍यात दिवाड बेटावरील श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे मंदिर सापडले. पोर्तुगीजांनी गोव्‍यातील हिंदूंचा अपमान करण्‍यासाठी म्‍हणून त्‍यातील शिवलिंग एका विहिरीच्‍या काठावर अशा पद्धतीने आडवे टाकून दिले की, कोणी माणूसत्‍या विहिरीचे पाणी शेंदतांना (दोरीच्‍या सहाय्याने विहिरीतून पाणी काढताना) त्‍याचा पाय त्‍या शिवलिंगाला लागावा. पुढे विजापूरच्‍या आदिलशहाचा भतग्राम उर्फ डिचोली येथील अधिकारी नारायण सूर्यराव देसाई याला देवाचा दृष्‍टांत झाला आणि त्‍याने इ.. १५४६ मध्‍ये दिवाडी येथून ते शिवलिंग अगदी रातोरात पळवून भतग्राम महालातील लाठंबावसे गावात नेऊन ठेविले. तिथे ते जवळ जवळ तीन वर्षे पडून होते. त्‍यानंतर इ.. १५६९ मध्‍ये श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे शिवलिंग हिंदळे गावात नेले गेले. तेथे डोंगराळ भागात एक खडक कोरून गर्भगृह तयार करण्‍यात आले आणि तेथे त्‍या शिवलिंगाची स्‍थापना करून पुढे मंदिराचे अंतराळ व सभामंडप बांधण्‍यात आले.

नार्वे येथील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिराच्‍या जीर्णोद्धाराबद्दल अशी आख्‍यायिका सांगितली जाते की, जेव्‍हा छत्रपती शिवाजी महाराजांनी भतग्राम महाल आदिलशहाकडून जिंकून घेतला त्‍यावेळी लाटंबारसे, नार्वे व हिंदळे ही गावे देखील त्‍यांच्‍या ताब्‍यात आली. जवळच नार्वे गावात सप्‍तकोटीश्‍वराचे मंदिर असल्‍याचे त्‍यांना समजले. ते ताबडतोब देवदर्शनासाठी नार्वे येथे आले. त्‍यांनी पाहिले की, एका मोठ्या कोनाड्यात श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे शिवलिंग स्‍थापन करून जवळच दगडी पणती तेवत ठेवली होती. नारळाच्‍या वाळलेल्‍या झावळ्यांचा सभामंडप तयार केला होता. समोर आवार मोकळ होत. या चंद्रमौळी शिवालयासमोर शिवाजी महाराज आपल्‍या अधिका-यांबरोबर उभे होते. मंदिराची दुरावस्‍था पाहून महाराजांनी त्‍याचा जीर्णोद्धार करण्‍याची ठरविले. शुचिर्भूत होऊन ते पूजेला बसले. वेदमंत्रांच्‍या घोषात अभिषेकाच्‍या धारा त्‍या शिवलिंगावर पडू लागल्‍या. दुपारची वेळ झाली आणि पूजा संपत आली. महाराज श्रीं स बिल्‍वपत्र (बेलाचे पान) व फूले वाहत होते. इतक्‍यात छताला लावलेल्‍या नारळाच्‍या वाळक्‍या झावळ्यांतील एक झावळी निसटली आणि सळकन महाराजांच्‍या अंगावर येऊन पडली. तो शुभशकून होता. महाराजांनी मंदिराच्‍या पूजा-यांना सांगितले की, आता इथे आपले राज्‍य आले. यापुढे श्रीसप्‍तकोटीश्‍वर असा उन्‍हापावसात राहणार नाही.’

शिवाजी महाराजांनी आपले ११००० घोडदळ भतग्राम उर्फ डिचोलीहून नार्वे येथे आणविले आणि तेथे आपली लष्‍करी छावणी उभारली. श्रीसप्‍तकोटीश्‍वर महादेवाच्‍या शिवालयाच्‍या जीर्णोद्धाराला सुरूवात झाली. इथे असा प्रश्‍न पडतो की, शिवालयाचे बांधकाम सुरू असताना खुद्द शिवाजी महाराजांनी इतक्‍या मोठ्या सैन्‍यासह नारव्‍याला मुक्‍काम का केला होता. वास्‍तविक बांधकाम पूर्ण करण्‍याची जबाबदारी ते एखाद्या अधिका-यावर सहज टाकू शकले असते आणि त्‍याने ती जबाबदारी योग्‍य प्रकारे पार पाडली असती. असे असताना महत्त्वाची राजकारणे बाजूला सारून शिवाजी महाराजांचा नारव्‍यातील मुक्‍काम हा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे बांधकाम करणे हे धर्मकार्य तर होतेच पण धर्मकार्याबरोबरच इतर कोणते विचार त्‍यांच्‍या मनात सुरू होते ते आज सांगणे कठीण आहे. नारव्‍याहून समोर पोर्तुगीजांचे गोवा शहर दिसत होते. ही पोर्तुगीजांची नगरी पाहून त्‍यांच्‍या मनात कोणते विचार आले असतील?

एकीकडे श्रीसप्‍तकोटीश्‍वराची स्‍थापना आणि दुसरीकडे पोर्तुगीजांच्‍या गोवा शहरावर आक्रमण करून त्‍यांचे तिथून उच्‍चाटन, हे दोन्‍ही हेतू महाराज एकाच ठिकाणी राहून साध्‍य करणार होते. प्रथम रवळो शिणवी नामक देसायाच्‍या मुलखात महाराजांनी आक्रमण केले तेव्‍हा तो पोर्तुगीजांच्‍या आश्रयाला गोवा शहरात गेला. त्‍याच्‍या पाठलागाचे निमित्त करून महाराज आपल्‍या सैन्‍यासह पोर्तुगीजव्‍याप्‍त गोव्‍यात शिरले. मराठ्यांच्‍या आकस्मिक आगमनामुळे पोर्तुगीज व्‍हॉइसरॉयने त्‍यांच्‍याशी तह केला आणि आक्रमण थांबविले. त्‍यानंतर महाराजांनी व्‍हॉइसरॉयला बेसावध ठेवण्‍यासाठी आपला वकील त्‍याच्‍याकडे पाठवून दिला. त्‍यामुळे त्‍याला वाटले की आता तह झाला. शिवाय मराठ्यांचा वकीलही इथे आला तेव्‍हा मराठ्यांशी तंटा आता मिटला.

व्‍हॉइसरॉयकडे वकील पाठवून त्‍याला बेसावध करणे हा गनिमी काव्‍याचा एक भाग होता. नेमक्‍या याच कालावधीत महाराजांनी पोर्तुगीजांवर आक्रमण करण्‍याची योजना आखली. त्‍यावेळी मंदिराच्‍या बांधकामासाठी गवंडी, लोहार, सुतार, पाथरवट, मजुर वगैरे लोकांची पोर्तुगीजव्‍याप्‍त गोव्‍यात ये जा सुरू होती. याचा फायदा घेऊन निरनिराळ्या कामांच्‍या निमित्ताने त्‍यांनी आपल्‍या सैनिकांना वेषांतर करून गोवा शहरात पाठवून दिले. अनेक प्रकारची सोंगेढोंगे करून रात्री अपरात्री हे सैनिक शहरात वावरू लागले. एका महिन्‍यात सुमारे सैनिक ५०० गोव्‍यात शिरले.

शिवाजी महाराजांची योजना अशी होती की, सुमारे दीड-दोन हजार सैनिक गोवा शहरात गुप्‍तपणे घुसवायचे, योग्‍य वेळ साधून घुसलेल्‍या सैनिकांनी शहराच्‍या दरवाजांचा ताबा मिळवायचा आणि पोर्तुगीजांना आत कोंडून त्‍यांचा धुव्‍वा उडवायचा. शिवाय शिवाजी महाराजांबरोबर असलेल्‍या सैन्‍याने गोवा शहरावर चाल करायची. एकाच झडपेत गोवा शहर जिंकून घ्‍यायची त्‍यांची धाडसी योजना होती. परंतु पोर्तुगीज सावध होते. त्‍यांनी शहरात घुसलेल्‍या सर्व मराठी सैनिकांना कैद केले, मराठ्यांच्‍या वकीलाचा भर दरबारात अपमान केला आणि त्‍या सर्वांना आपल्‍या राज्‍याच्‍या सरहद्दीबाहेर हाकलून दिले. इतकेच नव्‍हे तर ते लढायला देखील सज्‍ज झाले. ही गोष्‍ट इ.. १६६८ च्‍या ऑक्टोबर महिन्‍यात घडली. पण याबद्दल मराठी दप्तरात किंवा पोर्तुगीज दप्‍तरात कोणत्‍याही प्रकारची नोंद सुद्धा नाही. हा प्रकार कारवार येथील फिलिप गिफोर्ड व चेंबरलेन या इंग्रज अधिका-यांनी लिहिलेल्‍या पत्रात नमूद करण्‍यात आला आहे.

एकीकडे गोवा शहरात सैन्‍य घुसवून आक्रमण करण्‍याचा उद्देश जरी सफल झाला नसला तरी श्रीसप्‍तकोटीश्‍वराच्‍या मंदिराचे बांधकाम मात्र ठरल्‍याप्रमाणे सुरू होते. शके १५९० कार्तिक वद्य पंचमी, शुक्रवारी म्‍हणजे दिनांक १३ नोव्‍हेंबर १६६८ रोजी, सुमुहूर्तावर महाराजांनी श्रीं च्‍या मंदिराच्‍या बांधकामाला सुरूवात केली. या शुभकार्यासंबंधीचा शिलालेख मंदिराच्‍या महाद्वारावर लावण्‍यात आलेला आहे, तो असाः श्रीसप्‍तकोटीश शके १५९० किलकाब्‍दे कार्तिक कृष्‍ण पंचम्‍या सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्‍य प्रारंभ.

हा शिलालेख कोरताना शुक्रवार ऐवजी सोमवार कोरण्‍यात आले आहे. परंतु महाराज मंदिराचे बांध्‍काम पूर्ण होईपर्यंत नारव्‍याला थांबले नाहीत. ते मुहूर्त करून लगेच राजगडाकडे निघून गेले. राजकारण करीत असताना त्‍याला धर्मकारणाची जोड देण्‍याचा अनोखा प्रयत्‍न करणा-या शिवाजी महाराजांनी या महाराष्‍ट्र भूमीत हिंदवी स्‍वराज्‍य कस निर्माण केल असेल याची या गोष्‍टीवरून कल्‍पना येते. यशापयश हे कोणाच्‍याच हातात नसत, असतात ते फक्‍त योग्‍य दिशेने प्रयत्‍न आणि तेच त्‍यांनी अखेरपर्यंत केल. त्‍याकाळी सर्व देशभर परकीय, परधर्मीय राजसत्तांचा जम बसला असतानासुद्धा महाराजांनी त्‍या सर्वांचा रोष पत्‍करून स्‍वतःच राज्‍य म्‍हणजे स्‍वराज्‍य निर्माण करताना सामान्‍य जनतेच्‍या भावनांची नेहमी कदर केली. सामान्‍य जनता धर्माने कोणीही असो, महाराजांनी कधी धार्मिक छळ केला नाही. केवळ कोणी परधर्मीय आहे म्‍हणून कधी कोणाला वाईट वागणूक दिली नाही. त्‍यांनी स्‍वधर्म, स्‍वाभिमान आणि स्‍वत्‍व कधी सोडले नाही. हे हिंदू राज्‍य आहे आणि त्‍यात सर्व धर्मियांना सारखीच वागणूक दिली जाते हा विचार त्‍यांनी प्रत्‍यक्ष अंमलात आणला. पण हे करीत असताना त्‍यांनी परधर्मियांची राजकीय दंडेली कधीही सहन केली नाही, हे विशेष आहे.

- इतिहास संशोधक महेश तेंडुलकर

(श्री साई सागर दीपावली विशेषांक २००९ यांच्‍या सौजन्‍याने)